कॉलेज जीवनात हमखास प्रत्येक मुलाच्या आयुष्यात एखादी राजकुमारी येते तर मुलीच्या जीवनात एखादा राजकुमार येतो. धाडसी असणारे मग आपले प्रेम व्यक्त करतात आणि सुखी जीवनाची स्वप्नं रंगवू लागतात. आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली जाते. पण फारच कमी प्रेम प्रकरणे यशस्वी होतात. कारण घरचा विरोध हे सगळ्यात मोठं कारण असतं. बहुतेक प्रेम प्रकरणात मुलगा, मुलगी वेगळ्या जातीची, वेगळ्या धर्माची असतात. प्रेम करताना काहीच वाटत नाही. प्रेम करताना जात, धर्म आडवा येत नाही. (कारण प्रेम आंधळं असतं. ) पण निभावण्याच्या वेळेस मात्र असंख्य अडचणी येतात. जातीत, धर्मात प्रेम झालं तर अडचणी फक्त कमी असतात. जर प्रेम प्रकरण हे हिंदू मुस्लिम धर्मातील मुला- मुलीत असेल तर ? ते यशस्वी होण्याची शक्यता फारच कमी. कारण आपलं घर, समाज हे मान्य करायला तयार नसतो. कुटुंब,समाज प्रसंगी जीवावरही उठतो.
पण सोलापुरातील एक यशस्वी झालेली प्रेम कहाणी आहे. हिंदू धर्मातील मुलगी आणि मुस्लिम धर्मातील मुलगा. यांनी प्रेम केलं. आणि ते यशस्वीही केलं. सामान्यतः प्रेमात लोक बिघडतात. पण हे हे असं जोडपं आहे जे प्रेमात घडलं . आपलं करियर त्यांनी आधी घडवलं. १० वर्षांपासून त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि काहीच दिवसापूर्वी ते दोघे विवाहबद्धही झाले. या विवाह प्रसंगी सा. बहुजन आवाजचे उपसंपादक बुद्धजय भालशंकर उपस्थित होते. त्यांनी या प्रेमवीरांची कहाणी जाणून घेतली. अतिशय संघर्षमय आणि प्रेरणादायी अशी ही कहाणी आहे.
*ओळख*
इम्रान शेख (पोलीस उपनिरीक्षक, सध्या कार्यरत मुंबई) आणि छाया यांची ही कहाणी आहे. दोघेही महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. इम्रान दिसायला राजकुमारच. शरीरयष्टी दिमाखदार. बोलणंही समजूतदारणाच. २६ जानेवारी २००६ रोजी मित्राच्या शेतात हुरडा खायला गेल्यावर त्यांची ओळख झाली. खरं तर पहिल्याच भेटीत त्यांचं कडाक्याचं भांडण झालं. पण त्यानंतर भांडणाचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.
*संघर्ष*
* प्रेमात (बि) घडले*
PSI Imran Shaikh |
* घरचा विरोध*
या बाबतीत इम्रानची आई शिक्षित आणि समजूतदार असल्याने विरोध झाला नाही. पण छायाला मात्र चांगलाच विरोध सहन करावा लागला. घरी ही बातमी कळताच तिच्या घरी जणू 'बॉम्बच' पडला होता. आईने बोलणं सोडलं होत. तिच्यासाठी स्थळंही पाहायला सुरवात केली. पण छाया तितकीच निडर होती. छायाला लहान बहीण आहे. छाया बद्दल समाजातील लोकांना समजलं तर काय होईल? लहान मुलीसोबत लग्न कोण करणार? याची खरी चिंता आई वडिलांना सतावत होती. छायाने इम्रानशीच लग्न करण्याचा निर्धार केला होता आणि ते घरच्यांनाही आता समजून आले होते. छायाच्या आई वडिलांचा इम्रानला मुलगा म्हणून कोणताच विरोध नव्हता. कारण दिसायला तो रुबाबदार होता समजूतदार पण होता तो छायाला खुश ठेवणार याची खात्री त्यांना होती पण खरा विरोध होता तो इम्रानच्या धर्माला. महान संस्कृतीच्या बाता मारून माणसा माणसात भेद निर्माण करणारी ढोंगी समाजव्यस्था छायाच्या आई वडिलांसारखीच आज अनेक आई वडीलांच्या मानगुटीवर बसून आहे. त्यामुळे या दोघांना एक होता येत नव्हते. दरम्यानच्या काळात छायाच्या लहान बहिणीचं लग्न ठरलं . छायाने आणि तिच्या आई वडिलांनी पाहुण्या लोकांना छायाच्या प्रेम प्रकरणाबद्दल सविस्तर सांगून टाकलं जेणेकरून भविष्यात कोणताच प्रश्न उद्धभवला जाणार नाही. पाहुण्या मंडळींनाही काही अडचण नव्हती. उलट त्यांनी छायाचे कौतुक केले. लहान बहिणीचं लग्न अगोदर झालं. आता तिला एक मूल ही आहे. तिचा संसार सुखाचा सुरु आहे.
२००७ पासून तुमचं प्रेम आहे. लग्न तेंव्हाच का केलं नाही ? या प्रश्नाचं उत्तर इम्रानने खूपच सुंदर दिले. आमचे प्रेम आत्ताचे आहे. पण आपल्या आई बापाचे प्रेम आपण आईच्या पोटात असतो तेंव्हापासून असते. चार पाच वर्षाच्या प्रेमासाठी आई वडिलांचे प्रेम ठोकरून देऊ शकत नाही. छाया सोबत मला तिच्या घरचे लोक ही आनंदी ठेवायचे आहेत. माझ्यामुळे त्यांना कोणतेच दुःख होऊ नये असं वाटत. त्यामुळे इतकी वर्ष आम्ही थांबलो. लग्न काय पळून जाऊन पण करता आलं असतं. पण त्यामुळे आई बापाची समाजातील इज्जत कमी होते. मुलगी म्हणजे आई बापाची शान असते, स्वाभिमान असते यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मी आधी स्वतःला सिद्ध केले. आता हीच्या घरचे अभिमानाने सांगू शकतील माझी मुलगी पोलीस उपनिरीक्षकाची बायको आहे.
एम.पी.एस.सी.च्या अभ्यासक्रमात समाजसुधारक आहेत. भारतीय राज्यघटना आहे. कोणताही भेद तुम्ही करू नका आणि असा भेद होत असेल तर त्यावर काय कायदेशीर उपाययोजना आहेत हे थोडक्यात एम.पी.एस.सी सांगते. बहुतांश अधिकारी फक्त ते वाचून पास होतात तर काही मात्र ते स्वतःच्या मनात बिंबवून ठेवतात. इम्रान आणि छाया यांनीही तेच केलं. इतरांप्रमाणेच त्यांनी प्रेम केलं. पण इथल्या व्यस्थेनं जे विषमतावादी विष आमच्या नसा नसात पेरलं आहे त्याला त्यांनी विरोध केला. याचे आम्हांला कौतुक आहे. स्वतःच माणूसपण सिद्ध करण्यासाठी त्यांनी लढा दिला. मी कोणत्या धर्माचा आहे याच्याशी माझ्या प्रेमाचा काही संबंध नाही. कोणत्या धर्मात जन्माला यावं हे आमच्या हातात नाही. आम्ही माणसावर प्रेम केलं आणि ते प्रेम कोणताच धर्म नाकारू शकत नाही. धर्माच्या नावावर जो माणसामाणसात भेद केला जातो तो भेद यांनी नाकारला. विषमतावादी धर्म व्यस्थेची गढी उध्वस्त करण्यासाठी यांनी पाऊल टाकले आहे. छायाच्या आई वडिलांनी पूर्णपणे छायाचा आणि इम्रान चा स्वीकार केला नाही. त्यामुळे स्वतःला परिवर्तनाचे शिलेदार म्हणणाऱ्यांनी यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. छायाच्या आई वडीलांपर्यंत हा संदेश गेला पाहीजे की समाज या दोघांच्या पाठीशी खंबीर उभा आहे. आपण आता यांच्या प्रेमाला विरोध करता कामा नये. छायाला पुन्हा एकदा आई वडिलांचे प्रेम मिळवून देण्याची जबाबदारी आता आपली आहे. बहुजन आवाज यांच्या पाठीशी उभा आहे. "धर्मापेक्षा माणूसच श्रेष्ठ" हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी जो संघर्ष केला त्याला आमचा सलाम !
बुद्धजय भालशंकर
मो. ९९६०३७२७३६
(इम्रान शेख यांच्याशी संपर्क साधण्यासाठी. मो. नं. ८८५६९७८७९८)
No comments:
Post a Comment