आमच्या दृष्टीने 'व्हॅलेंटाइन डे' चा अर्थ व्यापक आहे. हा प्रेमाचा दिवस आम्ही आई मुलाचं ,बाप मुलाचं, मुलीचं , भावा भावाच ,बहिणीचं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून का साजरा करू नये.? नवरा बायकोचा प्रेमाचा दिवस म्हणून हा दिवस का साजरा करू नये.? प्रेमी युगुलांना अनेक इतिहासातील अजरामर प्रेम कहाण्या माहित असतात. हिर - रांझा, रोमिओ ज्युलिएट ,देवदास पारो या प्रेम कहाण्या आजही तितक्याच उत्सुकतेने वाचल्या जातात, ऐकल्या जातात. प्रेम ही मानवी आयुष्यातील महत्वाची गोष्ट आहे. प्रेमाशिवाय मनुष्य प्राणी जगू शकत नाही त्यामुळे लोक प्रेम करत होते, प्रेम करत आहेत आणि उद्याही करीतच राहतील. प्रेम करणाऱ्या जोडप्यांसाठी जगातील तीन महान प्रेम करणाऱ्या जोड्यांची माहिती 'व्हॅलेंटाइन डे' च्या निमित्ताने देत आहोत जेणे करून आजची भरकटत जाणारी युवा पिढी प्रेमात बिघडणार नाही तर आपले आयुष्य घडविणार :
१) सिद्धार्थ आणि यशोधरा
जगाला प्रेमाचा संदेश देणारा सिद्धार्थ गौतम बुद्ध. वैयक्तिक आयुष्यात सिद्धार्थने आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम केले. यशोधरासोबत लग्न हे स्वयंवर जिंकल्यानंतरच झाले. सिद्धार्थ आणि यशोधराची प्रेम कहाणी ही अगदी राजा राणी सारखी. पण मानवमुक्तीसाठी जेंव्हा घर सोडण्याची वेळ आली तेंव्हा सिद्धार्थने ह्रदयावर दगड ठेवून घर सोडले. मध्यरात्री यशोधरा आणि तिच्या कुशीत चिमुकला गोंडस राहुल देऊन सिद्धार्थ मानव कल्याणासाठी बाहेर पडला.
यशोधरेनेही त्यानंतर आपले कर्तव्य पार पाडले. माझा नवरा, माझा नवरा ती करत बसली नाही. आपल्या सासू सासरे यांची काळजी तिने घेतली. छोट्या राहुलचे पालन पोषण तिने केले. आपल्या नवऱ्याचे कार्य हे समस्त मानवमुक्तीचे कार्य आहे हे तिने जाणले होते. प्रेमात एकमेकांना समजून घेणे फार महत्वाचे असते आणि हाच आदर्श या प्रेम करणाऱ्या जोडीने समस्त मानवजातीस दिला.
२) ज्योतिबा आणि सावित्री
ज्योतिबा आणि सावित्री हे दोघे तर खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणासाठी , बहुजन शिक्षणासाठी रात्र दिवस राबले. पती पत्नीने साथ कशी द्याचा याचा आदर्श या जोडीने घालून दिला. सावित्रीला मुलबाळ होत नव्हते ; घरातल्या पासून ते समाजातील अनेक जणांकडून ज्योतीबांना दुसरे लग्न करण्याचा सल्ला देण्यात आला होता. एके रात्री सावित्रीमाईने विषय काढला , त्या म्हणाल्या ," माझं जरा ऐकावं . आपल्या वंशाला दिवा हवा . मला तर काही मूल होत नाही तुम्ही दुसरं लग्न करावं माझी काहीच हरकत नाही." तेंव्हा ज्योतिबा ताडकन उद्गारले, " वा रे वा लय शहाणी लागून गेल्यासारखं बोलत आहेस. जर मूलबाळ होत नाही म्हणून स्त्रीला दुसरं लग्न करण्याचा अधिकार नाही तर पुरुषाला तो अधिकार कोणी दिला ?" ज्योतीबांचे हे उत्तर आजही बायकोला सोडून देणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.
३) भीमराव आणि रमा
भीमराव आणि रमा ही जोडी एकमेकांसाठी जीव की प्राण. त्याच प्रमाणे ही जोडी या भारत देशातील तमाम दीन दलितांसाठीही जीव कि प्राणच होय. भीमराव आणि रमा या जोडीने असे प्रेम केले ,असा संसार केला की आज ही जोडी कोट्यवधी लोकांसाठी आई -बाप म्हणून आदर्श आहे. प्रेम, त्याग, विरह याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भीमराव आणि रमा यांचे प्रेम. भाजी मंडई मध्ये रात्रीच्या वेळी यांचे लग्न झाले पण पुढे यांच्यामुळे कोट्यवधी लोकांच्या आयुष्यात सूर्य उगवला. एसी हॉल मध्ये, मोठ्या थाटात, वाजत गाजत आज आमच्या बांधवांची लग्न होऊ लागली. आपल्या जोडीदाराला कस घडवायचं हे आम्हाला रमाई कडून शिकल पाहिजे. भीमरावांना 'साहेब' बनवण्यासाठी रमाईने खस्ता खाल्या. बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात होते, त्यानंतर समाजासाठी ते घराबाहेर होते. त्यामुळे रमाईसाठी त्यांना वेळ देता येत नव्हता . रमाईने आयुष्यात पतीचा विरहच सहन केला पण त्या बाबतीत कोणतीच तक्रार केली नाही. परदेशातून बाबासाहेब भारतात परतले तेंव्हा त्यांना भेटायला जाण्यासाठी रमाईकडे नवीन साडी नव्हती अंगावर फाटकी ,ठिगळं लावलेली साडी होती. पतीला तर भेटायचं होत. अश्या वेळेस शाहू महाराजांनी बाबासाहेबांना दिलेला फेटा साडी म्हणून नेसून रमाई बाबासाहेबांच्या स्वागताला गेली. इतरांच्या हे लक्षात आले नाही पण बाबासाहेबांच्या मात्र लगेच हे लक्षात आले, याला म्हणतात खरं प्रेम. दोघांची नजरा नजर झाली आणि त्याचं नजरेने एकमेकांची खुशाली जाणून घेतली. शब्दांच्या पलीकडची ही प्रेमाची भाषा.
आजकाल प्रेम करणाऱ्या जोडप्यांना ,नवरा बायकोला लांब रहायचं, विरह सहन करायचं जमत नाही. त्यांच्यासाठी भीमराव आणि रमा यांचे उदाहरण देता येईल. रमाईला लिहलेल्या पत्रात बाबासाहेब म्हणतात ," बोट सुरु होताना तुझ्या डोळयातील आसवं पाहिली, मलाही थोडं गलबलून आलं. पण रमा हे विरह आणि दुःखच आपल्याला मोठं करणार आहेत. ती दुःखच माणसाला प्रकाशात नेतात, त्याचे आभार मानायचे असतात. रमा अश्या दुःखांनी दुःखी व्हायचं नसतं." बाबासाहेबांचंही रमाईवर खूप प्रेम. त्याचमुळे तर त्यांनी आपला "थॉट्स ऑन पाकिस्तान" हा ग्रंथ आपल्या प्रिय रामूस (बाबासाहेब रमाईस प्रेमाने 'रामू' हाक मारायचे) अर्पण केला. भीमराव आणि रमा यांच्या प्रेमाला सलाम !
एकमेकांना साथ कशी द्याची, प्रेम कसं करायचं , आयुष्य कसं घडवायचं, स्वतःच्या प्रेमातून समाज कसा घडवायचा हे आम्हाला या प्रेम करणाऱ्या या तीन महान जोड्यांकडून शिकता येईल. म्हणून म्हणतोय प्रेम करावं तर यांच्यासारख.....
बुद्धजय भालशंकर
अभियंता , सोलापूर
मो. ९९६०३७२७३६
No comments:
Post a Comment