१९ फेब्रुवारी १६३० रोजी छ. शिवाजी महाराजांचा जन्म जिजाऊंच्या पोटी झाला. देशात आणि महाराष्ट्रातही तेंव्हा सत्तेसाठी मोठी स्पर्धा सुरु होती. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही यांच्यातील संघर्ष. दिल्लीतील औरंगजेबाला दख्खन प्रदेशाची लालसा यावरून सतत लढाया सुरु असत. लढाया या सतेसाठी होत्या. धर्माच्या विरोधात नव्हत्या हे आपण समजून घेतले पाहिजे. हिंदूंविरुद्ध हिंदू, मुस्लिमविरुद्ध मुस्लिम , हिंदूंविरुद्ध मुस्लिम, मुस्लिमविरुद्ध हिंदू अश्या पद्धतीची लढाई होत होती. या लढाई मध्ये गरीब बिचारी रयत मात्र भरडली जात होती. प्रजेचा कोणीच वाली नव्हता. हा एक प्रकारचा अन्याय होता आणि या विरोधात पेटून उठला तो या मातीतला आमचा राजा, बहुजनांचा राजा - राजा शिवाजी.
जिजाऊंनी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा दिली ,बळ दिले, मार्गदर्शन दिले. त्यामुळे स्वराज्य व्हावे हि "श्री " ची नव्हे तर जिजाऊंची इच्छा होती. जिजाऊंच्या प्रेरणेवर,मावळ्यांच्या पराक्रमावर,त्यागावर, शौर्यावर आणि महाराजांच्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर हे स्वराज्य उभे राहिले. या रयतेच्या राज्यात कोणताच भेद नव्हता. कोणतीही वर्णव्यवस्था नव्हती. महाराजांनी स्वराज्यामध्ये वर्णव्यव्यस्था लाथाडली होती हे एक प्रकारचे सामाजिक, धार्मिक बंडच होते. जे बंड इथल्या मनुवादी, ब्राम्हणवादी व्यवस्थेला रुचले नाही त्यामुळेच शिवाजी राजा केवळ आमच्या मुळे झाला असा प्रचार योग्य तंत्राच्या माध्यमातून घडवून आणला गेला. इतिहासाची मोडतोड करून चुकीचा इतिहास आमच्या माथी मारला. त्यामुळेच मग शिवाजी महाराजांचा गुरु दादोजी कोंडदेव झाला. रामदास झाला. महाराजांना म्हणे भवानी मातेने तलवार दिली. स्वराज्य व्हावे ही तर 'श्री' ची इच्छा. म्हणजे महाराजांचे शौर्य , मावळ्यांचा पराक्रम यांना काहीच किंमत नाही. 'गो ब्राम्हण' प्रतिपालक म्हणून शिवाजी महाराजांची प्रतिमा निर्माण करण्यात आली. पण अफजलखानाला मारले तेंव्हा महाराजांवर वार करणारा कृष्णाजी कुलकर्णी मात्र लपवून ठेवला. अफजलखान सांगत असताना कृष्णाजी कुलकर्णी का सांगितला जात नाही ? याचे उत्तर आम्हाला आता हवे आहे. शिवाजी महाराजांवर वार करणारे, घात करणारे कोण होते हे आता आम्हाला समजून येत आहे.शिवाजी महाराजांनी जागेवरच कृष्णाजी कुलकर्णीचा खात्मा केला. .शिवाजी महाराजांनी किती गायी पाळल्या होत्या याचे उत्तर देऊनच यापूढे त्यांना 'गोब्राह्मण प्रतिपालक' संबोधावे.
शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने बहुजनांचे राजे होते. ते बहुजन प्रतिपालक होते. शिवाजी महाराज शूद्र समाजाचे म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यास गागाभटाने नकार दिला होता. भरमसाठ धन देऊन महाराजांनी त्याच्या कडून राज्याभिषेक करवून घेतला होता. हा एक प्रकारचा आमच्या राजाचा अपमान होता. या अपमानाची सल महाराजांच्या मनातही होतीच म्हणूनच तर त्यांनी नंतरच्या काळात वैदिक राज्याभिषेक नाकारून आधुनिक विचारसरणीचा राज्याभिषेक करवून इथली मनुवादी व्यवस्था लाथाडली.
महाराज हे बहुजनांचे राजे होते हे म. फुले यांनी सर्वप्रथम सांगितले. महाराजांची समाधी त्यांनीच तर शोधून काढली. पहिला पोवाडा मा. फुले यांनी लिहिला. पण शिवजयंतीच श्रेय टिळकांना दिलं जात. ते का? शिवाजी राजाला एका विशिष्ट वर्गापुरतेच मर्यादित करण्याची खेळी तेंव्हाच खेळली होती. आणि ती यशस्वीही झाली. त्यामुळेच तर मग महाराजांचा उपयोग मुसलमानाच्या विरोधात होऊ लागला. आम्हांला केवळ अफजलखानच माहीत आहे. शाळेतही फोटोसह अफजलखान सांगितला जातो. पण महाराजांचे अंगरक्षक मुस्लिम होते, दारुगोळा विभागाचा प्रमुख मुस्लिम होता हे मात्र शिकववले जात नाही. हा इतिहास मात्र लपवून ठेवला जातो.
शिवाजी राजाला जातीचा रंग दिला आणि मराठा जातीत त्यांना बंदिस्त करून टाकले. महाराजांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करा म्हणून सांगणारे स्वतःच्या जयंत्या,वाढदिवस पुण्यतिथ्या तिथीप्रमाणे का साजरे करीत नाहीत? टिळक, आगरकर, सावरकर,ठाकरे यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या तिथीप्रमाणे का साजऱ्या केल्या जात नाहीत? शिवाजी राजा आमच्यासाठी झटला होता त्यामुळे त्याच्यावर कोणत्याच एका जातीचा वर्गाचा किंवा पक्षाचा " कॉपीराईट" नाही. ज्यांना खरा शिवाजी जाणून घ्यायचा आहे त्यांनी श्रीमंत कोकाटे,आ.ह. साळुंके , गोविंद पानसरे यांची पुस्तके वाचावी. म्हणजे यापुढे तरी " आमच्या धडावर आमचेच मस्तक राहील "
शिवजयंतीनिमित्त या महान राजास मानाचा मुजरा.!!!!
बुद्धजय भालशंकर
मो. ९९६०३७२७३६