Thursday, August 17, 2017

राजकीय पक्षांनी स्वतःच्या तत्व प्रणालीला देशापेक्षा मोठे मानलेे , तर स्वातंत्र धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही


           
     दिनांक २५ नोव्हेबर १९४९ ला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेत शेवटचे भाषण झाले.
                       ते म्हणाले
२६ जानेवारी १९५० ला भारत एक स्वतंत्र राष्ट्र होईल.*
त्यांच्या स्वातंत्र्याचे काय होईल ? तो आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवील की पुन्हा गमावून बसेल ? हा विचार माझ्या मनात प्रथम उभा राहतो.
असे नाही की भारत हा यापूर्वी कधीही स्वतंत्र नव्हता. मुद्दा हा आहे की त्याने असलेले स्वातंत्र्य एकदा गमावले आहे , पुन्हा दुसऱ्यांदा ते गमाविल का ? भूतकाळात भारताने केवळ आपले स्वातंत्र्य गमावले असे नव्हे तर ते देशातील काही लोकांच्या बेइमानी आणि विश्वासघातामुळे गमावले गेले हि वास्तविकता मला अधिक अस्वस्थ करते.
महम्मद बीन कासीमने सिंध प्रांतावर आक्रमण केले त्यावेळी दहार राजाच्या  सैनिक अधिकाऱ्यांनी महम्मद बीन कासीमच्या हस्तकाकडून लाचा स्वीकारल्या आणि आपल्या राजाकडून लढण्याचे नाकारले.
    महम्मद घोरीला भारतावर आक्रमण करण्याचे निमंत्रण देणारा जयचंद हा होता.आणि त्याने त्याला पृथ्वीराज विरुद्ध लढण्यासाठी स्वतःच्या आणि सोळंकी राजाच्या मदतीचे आस्वासन दिले .
       जेव्हा छत्रपती शिवाजी हिंदूंच्या मुक्तीसाठी लढत होते त्यावेळी इतर मराठे सरदार आणि रजपूत राजे मोगल सम्राटांच्या बाजूने लढत होते.
    जेव्हा शीख राज्यकर्त्यांना नि:पात करण्याचा प्रयत्न इंग्रज करीत होते तेव्हा त्यांचा सेनापती गुलाबचंद शांत बसला आणि शिखांचे राज्य वाचविण्यासाठी त्याने शिखांना मदत केली नाही.
       १८५७ ला भारतातील बहुतांश भागांनी इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्य युद्धाची घोषणा केली तेव्हा शीख बघ्यांच्या भूमिकेतुन त्या घटनेकडे पाहत राहिले.

    *इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय* ? 

 जातीच्या आणि संप्रदायाच्या स्वरूपातील आपल्या जुन्या शत्रू सोबतच भिन्न आणि परस्परविरोधी विचार प्रणाली असणाऱ्या राजकीय पक्षांची भर पडणार आहे. ह्या वास्तवाच्या जाणिवेने मी  अधिकच चिंतातुर झालो आहे.

भारतीय लोक आपल्या तत्वप्रणालीपेक्षा देशाला मोठे मानतील की देशापेक्षा तत्वप्रणालीला मोठे मनातील?  परंतु एवढे मात्र निश्चित की जर राजकीय पक्षांनी स्वतःच्या तत्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले तर आपले स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.आणि कदाचित कायमचे घालविले जाईल.या संभावेविरुद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध व्हायला हवे.

आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धार केलाच पाहिजे.
     ह्या लोकसत्ताक संविधानाचे काय होणार ?
   हा देश ते अबाधित ठेवण्यासाठी समर्थ राहील का पुन्हा तो ते गमावून बसेल.
        भारताला लोकशाही म्हणजे काय हे माहित नव्हते असे नाही, एक काळ असा होता की भारत हा गणराज्यांनी भरगच्च होता आणि जिथे कुठे राजेशाही असेलच तर ती एकतर निवडलेली किंवा सीमित असायची भारताला संसद किंवा संसदीय प्रणाली माहित नव्हती असे नाही बौद्ध भिक्खू संघाच्या अभ्यासातून हे स्पष्ट होते की बुद्ध काळात संसद होती.बौद्ध भिक्खू संघ म्हणजेच संसद होय.
     
    *ही लोकसत्ताक पद्धती भारताने गमावली.पुन्हा दुसऱ्यांदा ती गमावणार काय*?

परंतु भारतासारख्या देशात हे सहज शक्य आहे.
     *लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल.  लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये.तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की जेणे करून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उध्वस्थ करण्यासाठी उपयोग करील.*

 संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतित केलेल्या महापुरुषाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काही गैर नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत.
     *इतर देशांच्या तुलनेत भारताला हा सावधगिरीचा इशारा लक्ष्यात घेणे अधिक गरजेचे आहे. कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल, परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अंधः पतन आणि अंतिमत: हुकूमशाही कडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.*
    केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानत कामा नये , आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीत(धार्मिक नव्हे) परिवर्तन करायला हवे. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही.
*सामाजिक लोकशाही म्हणजे काय?...तो एक जीवन मार्ग आहे.जो स्वातंत्र्य, समता, बंधुता यांना जीवनतत्त्वे म्हणून मान्यता देतो.*
   हजारो जातींमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल?
सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या  अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही याची आम्हाला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते आमच्या हिताचे ठरेल.

 *स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे या बद्दल शंका नाही. परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत याचा आपण विसर पडू देता कामा नये. या स्वातंत्र्यामुळे कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजांवर दोषा रोप करता येणार नाही, यापुढे जर काही वाईट घडले तर त्यासाठी आपल्याशिवाय इतर कुणालाही दोषी धरता येणार नाही.*!!!!!


       

       *डॉ.बाबासाहेब आंबेडकर*
           *लेखन आणि भाषणे*
                 (महाराष्ट्र शासन)
              *खंड १८, भाग ३*
             *पान न.१६०-१७५*

Thursday, March 9, 2017

Hindu code Bill

जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने महिला सक्षमीकरणाकरीता     झटणा-या बाबासाहेब आंबेडकरांनी जेंव्हा हिंदू कोडबील संसदेत मांडले तेव्हा त्यांना कीती प्रखर विरोधास सामोरे जावे लागले आणि हे बिल मंजूर होत नाही म्हणून शेवटी त्यांनी राजीनामा दिला. त्या काळातील काही व्यंगचित्रे






Tuesday, March 7, 2017

बायकोचे नटणे आवडले; सोशल मीडिया वरही भीमटोलाची चर्चा


बायकोचे नटणे आवडले; सोशल मीडिया वरही भीमटोलाची चर्चा
-----------------------------------------
मागच्या अंकात प्रकाशित झालेला "अजून किती दिवस दुसऱ्याची बायको नटविणार?" हा भीमटोला वाचकांना खूप आवडला. सोशल मीडिया  वरही हा भीमटोला शेयर करण्यात आला. अनेक व्हाट्स अप ग्रुप मध्ये हा भीमटोला फिरत होता. अनेक वाचकांनी पेपर सोबतच ब्लॉग वर ही हा भीमटोला वाचला. भीमटोलाने सडेतोड आणि वास्तवदर्शी भूमिका मांडली आहे अशी प्रतिक्रिया अनेक वाचकांनी दिली. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या बंगलोर  येथील अधिकारी मोनाली मेश्राम यांनी भीमटोलाच्या कल्पकतेचे कौतुक केले.
      वेगळ्या मांडणीतून राजकीय  विषय मांडला असून समाजाला विचार करायला लावणारा हा भीमटोला आहे अशी प्रतिक्रिया सांगलीहून आशुतोष कसबे,पुण्यातून महेश लोंढे ,सोलापुरातून विजयकुमार लोंढे, अंगद जेटिथोर यांनी  दिली.महेश क्षिरसागर यांनाही हा भीमटोला आवडला.  खबरदार...! जात बघून मतदान कराल तर  हा भीमटोला सुद्धा खूप छान होता अशी प्रतिक्रिया सोलापुरातील वाचक अंजली साबळे यांनी दिली.  बहुजन आवाजचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे. वाचकांच्या प्रेमाबद्दल आम्ही आभारी आहोत.
-संपादक
(भीमटोला वाचण्यासाठी येथे क्लिक करा )
http://bhimtola.blogspot.in/2017/02/blog-post_26.html?m=1

Monday, March 6, 2017

विझलो आज जरी मी,

 विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही.....
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही

छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही

माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे..
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..

रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर..
डोळ्यांत जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही..

येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही

- सुरेश भट                       

Friday, March 3, 2017

कैकाडी समाजाच्या चिमुकल्याने गाजविला ऑस्कर सोहळा


बाल अभिनेता -सनी पोवार
मुंबई :- जगभरात सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेटवर चालण्याचा अनुभव मुंबई येथे राहणाऱ्या कैकाडी समाजाच्या सनी पोवारने अनुभवला. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बॉलिवूडच्या ललनांहून अधिक लक्षणीय पुरस्कार सोहळा सनीमुळे ठरला.  हा सोहळा खऱ्या अर्थाने त्यानेच गाजविला.सूत्रसंचालक जिमी किमेल यांनी प्रेक्षकांमधून उचलून त्याला अभिनय कौशल्याची संधी दिली.
     २०१५ मध्ये "लायन" या हॉलिवूडच्या चित्रपटासाठी मुंबई, पुण्यातील सुमारे २००० मुलांमधून सनीची निवड करण्यात आली.  "लायन" या चित्रपटात त्याने ५ वर्षाच्या "सरू" या मुलाची  व्यक्तिरेखा साकारली आहे.  "आम्ही शिकलो नाही मात्र सनीला आम्ही शाळा पण शिकवणार आणि चित्रपटात कामही करायला देणार " असे सनीचे वडील दिलीप पोवार म्हणाले. 
   सनी कलिना येथील एअर इंडिया मॉडर्न या शाळेत शिकतो. दुभाषाच्या मदतीने त्याने चित्रपटातील प्रसंग  समजावून  घेतले. सनी कैकाडी समाजाचा  असल्यामुळे त्याच्या घरी तेलगू व कानडी मिश्रित भाषा बोलली जाते. त्यामुळे त्याची संभाषणाची भाषा हिंदी आहे. सनी ज्या परिसरात राहतो तेथेही अनेक कैकाडी समाजची घरे आहेत. 'आमच्या समाजातील मुलाने खूप नाव कमावले' असा आनंद ते व्यक्त करतात. ऑस्कर सोहळ्यातील सनीचे छायाचित्र त्याच्या राहत्या घरी झळकत आहे.


 
 मुलाने नाव कमविले;वडिलांनी नोकरी गमावली

मुलासोबत दौऱ्यावर राहिल्याने पालिकेच्या सफाई विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या दिलीप पोवार यांना कामावर हजर न राहिल्याने आपली नोकरी गमवावी लागली आहे. मुलाने नाव कमविल्याचा आनंद दिलीप यांना आहे मात्र नोकरी गेल्याने त्याला दुःखाची झालरही आहे. सनी याची आई घरकाम करून घर चालविते.

Monday, February 20, 2017

बहुजन प्रतिपालक राजा - छ शिवाजी महाराज


   
१९ फेब्रुवारी १६३० रोजी छ. शिवाजी महाराजांचा जन्म जिजाऊंच्या पोटी झाला. देशात आणि महाराष्ट्रातही तेंव्हा सत्तेसाठी मोठी स्पर्धा सुरु होती. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही यांच्यातील  संघर्ष. दिल्लीतील औरंगजेबाला दख्खन प्रदेशाची लालसा यावरून सतत लढाया सुरु असत. लढाया या सतेसाठी होत्या. धर्माच्या विरोधात नव्हत्या हे आपण समजून घेतले पाहिजे. हिंदूंविरुद्ध हिंदू, मुस्लिमविरुद्ध मुस्लिम ,  हिंदूंविरुद्ध मुस्लिम, मुस्लिमविरुद्ध हिंदू अश्या पद्धतीची लढाई होत होती. या लढाई मध्ये  गरीब बिचारी रयत मात्र भरडली जात  होती. प्रजेचा कोणीच वाली नव्हता. हा एक प्रकारचा अन्याय होता आणि या विरोधात पेटून उठला तो या मातीतला आमचा राजा, बहुजनांचा राजा - राजा शिवाजी.
        जिजाऊंनी  महाराजांना स्वराज्याची प्रेरणा दिली ,बळ दिले, मार्गदर्शन दिले. त्यामुळे स्वराज्य व्हावे हि "श्री " ची नव्हे तर जिजाऊंची इच्छा होती. जिजाऊंच्या प्रेरणेवर,मावळ्यांच्या पराक्रमावर,त्यागावर, शौर्यावर आणि महाराजांच्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर हे स्वराज्य उभे राहिले. या रयतेच्या राज्यात कोणताच  भेद नव्हता. कोणतीही वर्णव्यवस्था नव्हती. महाराजांनी स्वराज्यामध्ये वर्णव्यव्यस्था लाथाडली होती हे एक प्रकारचे सामाजिक, धार्मिक बंडच होते. जे बंड इथल्या मनुवादी, ब्राम्हणवादी व्यवस्थेला रुचले नाही त्यामुळेच शिवाजी राजा केवळ आमच्या मुळे झाला असा प्रचार योग्य तंत्राच्या माध्यमातून घडवून आणला गेला. इतिहासाची मोडतोड करून चुकीचा इतिहास आमच्या माथी मारला. त्यामुळेच मग शिवाजी महाराजांचा गुरु दादोजी कोंडदेव झाला. रामदास झाला. महाराजांना म्हणे भवानी मातेने तलवार दिली. स्वराज्य व्हावे ही तर 'श्री' ची इच्छा. म्हणजे महाराजांचे शौर्य , मावळ्यांचा पराक्रम यांना काहीच किंमत नाही. 'गो ब्राम्हण' प्रतिपालक म्हणून शिवाजी महाराजांची प्रतिमा निर्माण करण्यात आली. पण अफजलखानाला मारले तेंव्हा महाराजांवर वार करणारा कृष्णाजी कुलकर्णी मात्र लपवून ठेवला. अफजलखान सांगत असताना  कृष्णाजी कुलकर्णी का सांगितला जात नाही ? याचे उत्तर आम्हाला आता हवे आहे. शिवाजी महाराजांवर वार करणारे, घात करणारे कोण होते हे आता आम्हाला समजून येत आहे.शिवाजी महाराजांनी जागेवरच   कृष्णाजी कुलकर्णीचा खात्मा केला.  .शिवाजी महाराजांनी किती गायी पाळल्या होत्या याचे उत्तर देऊनच यापूढे त्यांना 'गोब्राह्मण प्रतिपालक' संबोधावे.  
    शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने बहुजनांचे राजे होते. ते बहुजन प्रतिपालक होते. शिवाजी महाराज शूद्र समाजाचे म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यास गागाभटाने नकार दिला होता. भरमसाठ धन देऊन महाराजांनी त्याच्या कडून राज्याभिषेक करवून घेतला होता. हा एक प्रकारचा आमच्या राजाचा अपमान होता. या अपमानाची सल महाराजांच्या मनातही होतीच म्हणूनच तर त्यांनी नंतरच्या काळात वैदिक राज्याभिषेक नाकारून आधुनिक विचारसरणीचा राज्याभिषेक करवून इथली मनुवादी व्यवस्था लाथाडली.
   महाराज हे बहुजनांचे राजे होते हे म. फुले यांनी सर्वप्रथम सांगितले. महाराजांची समाधी त्यांनीच तर शोधून काढली. पहिला पोवाडा मा. फुले यांनी लिहिला. पण शिवजयंतीच श्रेय टिळकांना दिलं जात. ते का? शिवाजी राजाला एका विशिष्ट वर्गापुरतेच मर्यादित करण्याची खेळी तेंव्हाच खेळली होती. आणि ती यशस्वीही झाली. त्यामुळेच तर मग महाराजांचा उपयोग मुसलमानाच्या विरोधात होऊ लागला. आम्हांला केवळ अफजलखानच माहीत आहे. शाळेतही फोटोसह अफजलखान सांगितला जातो. पण महाराजांचे अंगरक्षक मुस्लिम होते, दारुगोळा विभागाचा प्रमुख मुस्लिम होता हे मात्र शिकववले जात नाही. हा इतिहास मात्र लपवून ठेवला जातो.
            शिवाजी राजाला जातीचा रंग दिला आणि मराठा जातीत त्यांना बंदिस्त करून टाकले. महाराजांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करा म्हणून सांगणारे स्वतःच्या जयंत्या,वाढदिवस  पुण्यतिथ्या तिथीप्रमाणे का साजरे करीत नाहीत?  टिळक, आगरकर, सावरकर,ठाकरे यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या तिथीप्रमाणे का साजऱ्या केल्या जात नाहीत?  शिवाजी राजा आमच्यासाठी झटला होता त्यामुळे त्याच्यावर कोणत्याच एका जातीचा वर्गाचा किंवा पक्षाचा " कॉपीराईट"  नाही. ज्यांना खरा शिवाजी जाणून घ्यायचा आहे त्यांनी श्रीमंत कोकाटे,आ.ह. साळुंके , गोविंद पानसरे यांची पुस्तके वाचावी. म्हणजे यापुढे तरी " आमच्या धडावर आमचेच मस्तक राहील "
    शिवजयंतीनिमित्त या महान राजास मानाचा मुजरा.!!!!

बुद्धजय भालशंकर 
मो. ९९६०३७२७३६