Friday, March 3, 2017

कैकाडी समाजाच्या चिमुकल्याने गाजविला ऑस्कर सोहळा


बाल अभिनेता -सनी पोवार
मुंबई :- जगभरात सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेटवर चालण्याचा अनुभव मुंबई येथे राहणाऱ्या कैकाडी समाजाच्या सनी पोवारने अनुभवला. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बॉलिवूडच्या ललनांहून अधिक लक्षणीय पुरस्कार सोहळा सनीमुळे ठरला.  हा सोहळा खऱ्या अर्थाने त्यानेच गाजविला.सूत्रसंचालक जिमी किमेल यांनी प्रेक्षकांमधून उचलून त्याला अभिनय कौशल्याची संधी दिली.
     २०१५ मध्ये "लायन" या हॉलिवूडच्या चित्रपटासाठी मुंबई, पुण्यातील सुमारे २००० मुलांमधून सनीची निवड करण्यात आली.  "लायन" या चित्रपटात त्याने ५ वर्षाच्या "सरू" या मुलाची  व्यक्तिरेखा साकारली आहे.  "आम्ही शिकलो नाही मात्र सनीला आम्ही शाळा पण शिकवणार आणि चित्रपटात कामही करायला देणार " असे सनीचे वडील दिलीप पोवार म्हणाले. 
   सनी कलिना येथील एअर इंडिया मॉडर्न या शाळेत शिकतो. दुभाषाच्या मदतीने त्याने चित्रपटातील प्रसंग  समजावून  घेतले. सनी कैकाडी समाजाचा  असल्यामुळे त्याच्या घरी तेलगू व कानडी मिश्रित भाषा बोलली जाते. त्यामुळे त्याची संभाषणाची भाषा हिंदी आहे. सनी ज्या परिसरात राहतो तेथेही अनेक कैकाडी समाजची घरे आहेत. 'आमच्या समाजातील मुलाने खूप नाव कमावले' असा आनंद ते व्यक्त करतात. ऑस्कर सोहळ्यातील सनीचे छायाचित्र त्याच्या राहत्या घरी झळकत आहे.


 
 मुलाने नाव कमविले;वडिलांनी नोकरी गमावली

मुलासोबत दौऱ्यावर राहिल्याने पालिकेच्या सफाई विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या दिलीप पोवार यांना कामावर हजर न राहिल्याने आपली नोकरी गमवावी लागली आहे. मुलाने नाव कमविल्याचा आनंद दिलीप यांना आहे मात्र नोकरी गेल्याने त्याला दुःखाची झालरही आहे. सनी याची आई घरकाम करून घर चालविते.

No comments:

Post a Comment