Monday, July 29, 2024

आधी लग्न,नंतर प्रेम

बारावी शास्त्र शाखेत दोन वाऱ्या केल्यानंतरही उत्तीर्ण होण्याचा विचार दिसत नाही म्हटल्यावर लातूरला आय. टी. आय. केलं. आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने नोकरी शिवाय पर्याय नव्हता. पाहुणे मंडळींनी नोकरीची हमी दिल्याने लग्न करण्याचा बेत पक्का झाला. वधू संशोधनाचा मुहूर्त पक्का झाला. आमची स्वारी वडील, चुलते,यांच्यासह सासुरवाडीत (होणाऱ्या ) हजर झाली. वडील व चुलते पाहुण्यांसह इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते.  मी मात्र माझी होणारी ती कुठे आहे, कशी असेल ? ती मला पसंद करील किंवा नाही याचा शोध घेत होतो. अन झालं,पाहुण्यांनी माझ्या होणाऱ्या तिला चहा आणायला सांगितलं. चहा घेऊन येताना माझी 'ती' जेवढी गोंधळी नव्हती तेवढा तिच्यापेक्षा जास्त मीच गोंधळलो होतो. वधू संशोधन झालं. तिनं मला ,मी तिला पसंद केलं, आणि तिचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर लग्नापूर्वी होणाऱ्या सासुरवाडीला मित्राच्या लग्ना निमित्त गेलो. अक्षता पडल्या, जेवणं झाली पण माझं लक्ष मात्र ठिकाणावर नव्हतं. ती कुठे दिसतेय का?, मला बघतेय का? असं सारखं वाटत होतं. पण तसं काही घडत नव्हतं. शेवटी सासऱ्याच्या घराच्या बोळातून जाण्याच्या विचार केला. बोळ अरुंद. घर जवळ आलं तरी काही फायदा नाही. घर ओलांडून पुढे गेलो अन समोरून  साक्षात "ती" येत होती.  समोरासमोर येईपर्यंत तिला काहीच कळलं नाही. एकमेकांना धडकणार तेवढ्यात ती थांबली. काळजाचे ठोके वाढले, घामाने दरदरून गेली. तिला वाट करून देऊन पुढे निघून गेलो.
           हुंडा, मान -सन्मानाचा विचार न करता लग्न तिथी नसताना आषाढ महिन्यात लग्न उरकून घेतलं. फार मोठ्या अपेक्षा असताना त्या पूर्ण झाल्या नाहीत. लग्नात बूटही मिळाला नाही. साधी प्लास्टिक चप्पल घेतली होती. मी तीही  घातली नाही. पण पुढे माझ्या सौभाग्यवतीने कशाचीच उणीव भासू दिली नाही.तिच्या प्रेमापुढे काहीच कमी पडलं नाही.इतर लोक आधी प्रेम नंतर लग्न करतात परंतु आम्ही आधी लग्न नंतर प्रेम केलं. त्यामुळे सर्व काही व्यवस्थित चालू आहे. ऑगस्ट १९८५ मध्ये लग्न झालं. मुलं झाली. वेल मांडवाला गेला.

-  अण्णासाहेब भालशंकर
                     सोलापूर

(१९९८ मध्ये दै.  संचार मध्ये 'भेट तुझी माझी स्मरते' या सदर मध्ये प्रकाशित )
 

Thursday, August 17, 2017

राजकीय पक्षांनी स्वतःच्या तत्व प्रणालीला देशापेक्षा मोठे मानलेे , तर स्वातंत्र धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही


           
     दिनांक २५ नोव्हेबर १९४९ ला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेत शेवटचे भाषण झाले.
                       ते म्हणाले
२६ जानेवारी १९५० ला भारत एक स्वतंत्र राष्ट्र होईल.*
त्यांच्या स्वातंत्र्याचे काय होईल ? तो आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवील की पुन्हा गमावून बसेल ? हा विचार माझ्या मनात प्रथम उभा राहतो.
असे नाही की भारत हा यापूर्वी कधीही स्वतंत्र नव्हता. मुद्दा हा आहे की त्याने असलेले स्वातंत्र्य एकदा गमावले आहे , पुन्हा दुसऱ्यांदा ते गमाविल का ? भूतकाळात भारताने केवळ आपले स्वातंत्र्य गमावले असे नव्हे तर ते देशातील काही लोकांच्या बेइमानी आणि विश्वासघातामुळे गमावले गेले हि वास्तविकता मला अधिक अस्वस्थ करते.
महम्मद बीन कासीमने सिंध प्रांतावर आक्रमण केले त्यावेळी दहार राजाच्या  सैनिक अधिकाऱ्यांनी महम्मद बीन कासीमच्या हस्तकाकडून लाचा स्वीकारल्या आणि आपल्या राजाकडून लढण्याचे नाकारले.
    महम्मद घोरीला भारतावर आक्रमण करण्याचे निमंत्रण देणारा जयचंद हा होता.आणि त्याने त्याला पृथ्वीराज विरुद्ध लढण्यासाठी स्वतःच्या आणि सोळंकी राजाच्या मदतीचे आस्वासन दिले .
       जेव्हा छत्रपती शिवाजी हिंदूंच्या मुक्तीसाठी लढत होते त्यावेळी इतर मराठे सरदार आणि रजपूत राजे मोगल सम्राटांच्या बाजूने लढत होते.
    जेव्हा शीख राज्यकर्त्यांना नि:पात करण्याचा प्रयत्न इंग्रज करीत होते तेव्हा त्यांचा सेनापती गुलाबचंद शांत बसला आणि शिखांचे राज्य वाचविण्यासाठी त्याने शिखांना मदत केली नाही.
       १८५७ ला भारतातील बहुतांश भागांनी इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्य युद्धाची घोषणा केली तेव्हा शीख बघ्यांच्या भूमिकेतुन त्या घटनेकडे पाहत राहिले.

    *इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय* ? 

 जातीच्या आणि संप्रदायाच्या स्वरूपातील आपल्या जुन्या शत्रू सोबतच भिन्न आणि परस्परविरोधी विचार प्रणाली असणाऱ्या राजकीय पक्षांची भर पडणार आहे. ह्या वास्तवाच्या जाणिवेने मी  अधिकच चिंतातुर झालो आहे.

भारतीय लोक आपल्या तत्वप्रणालीपेक्षा देशाला मोठे मानतील की देशापेक्षा तत्वप्रणालीला मोठे मनातील?  परंतु एवढे मात्र निश्चित की जर राजकीय पक्षांनी स्वतःच्या तत्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले तर आपले स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.आणि कदाचित कायमचे घालविले जाईल.या संभावेविरुद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध व्हायला हवे.

आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धार केलाच पाहिजे.
     ह्या लोकसत्ताक संविधानाचे काय होणार ?
   हा देश ते अबाधित ठेवण्यासाठी समर्थ राहील का पुन्हा तो ते गमावून बसेल.
        भारताला लोकशाही म्हणजे काय हे माहित नव्हते असे नाही, एक काळ असा होता की भारत हा गणराज्यांनी भरगच्च होता आणि जिथे कुठे राजेशाही असेलच तर ती एकतर निवडलेली किंवा सीमित असायची भारताला संसद किंवा संसदीय प्रणाली माहित नव्हती असे नाही बौद्ध भिक्खू संघाच्या अभ्यासातून हे स्पष्ट होते की बुद्ध काळात संसद होती.बौद्ध भिक्खू संघ म्हणजेच संसद होय.
     
    *ही लोकसत्ताक पद्धती भारताने गमावली.पुन्हा दुसऱ्यांदा ती गमावणार काय*?

परंतु भारतासारख्या देशात हे सहज शक्य आहे.
     *लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल.  लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये.तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की जेणे करून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उध्वस्थ करण्यासाठी उपयोग करील.*

 संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतित केलेल्या महापुरुषाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काही गैर नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत.
     *इतर देशांच्या तुलनेत भारताला हा सावधगिरीचा इशारा लक्ष्यात घेणे अधिक गरजेचे आहे. कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल, परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अंधः पतन आणि अंतिमत: हुकूमशाही कडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.*
    केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानत कामा नये , आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीत(धार्मिक नव्हे) परिवर्तन करायला हवे. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही.
*सामाजिक लोकशाही म्हणजे काय?...तो एक जीवन मार्ग आहे.जो स्वातंत्र्य, समता, बंधुता यांना जीवनतत्त्वे म्हणून मान्यता देतो.*
   हजारो जातींमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल?
सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या  अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही याची आम्हाला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते आमच्या हिताचे ठरेल.

 *स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे या बद्दल शंका नाही. परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत याचा आपण विसर पडू देता कामा नये. या स्वातंत्र्यामुळे कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजांवर दोषा रोप करता येणार नाही, यापुढे जर काही वाईट घडले तर त्यासाठी आपल्याशिवाय इतर कुणालाही दोषी धरता येणार नाही.*!!!!!


       

       *डॉ.बाबासाहेब आंबेडकर*
           *लेखन आणि भाषणे*
                 (महाराष्ट्र शासन)
              *खंड १८, भाग ३*
             *पान न.१६०-१७५*

Thursday, March 9, 2017

Hindu code Bill

जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने महिला सक्षमीकरणाकरीता     झटणा-या बाबासाहेब आंबेडकरांनी जेंव्हा हिंदू कोडबील संसदेत मांडले तेव्हा त्यांना कीती प्रखर विरोधास सामोरे जावे लागले आणि हे बिल मंजूर होत नाही म्हणून शेवटी त्यांनी राजीनामा दिला. त्या काळातील काही व्यंगचित्रे






Tuesday, March 7, 2017

बायकोचे नटणे आवडले; सोशल मीडिया वरही भीमटोलाची चर्चा


बायकोचे नटणे आवडले; सोशल मीडिया वरही भीमटोलाची चर्चा
-----------------------------------------
मागच्या अंकात प्रकाशित झालेला "अजून किती दिवस दुसऱ्याची बायको नटविणार?" हा भीमटोला वाचकांना खूप आवडला. सोशल मीडिया  वरही हा भीमटोला शेयर करण्यात आला. अनेक व्हाट्स अप ग्रुप मध्ये हा भीमटोला फिरत होता. अनेक वाचकांनी पेपर सोबतच ब्लॉग वर ही हा भीमटोला वाचला. भीमटोलाने सडेतोड आणि वास्तवदर्शी भूमिका मांडली आहे अशी प्रतिक्रिया अनेक वाचकांनी दिली. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या बंगलोर  येथील अधिकारी मोनाली मेश्राम यांनी भीमटोलाच्या कल्पकतेचे कौतुक केले.
      वेगळ्या मांडणीतून राजकीय  विषय मांडला असून समाजाला विचार करायला लावणारा हा भीमटोला आहे अशी प्रतिक्रिया सांगलीहून आशुतोष कसबे,पुण्यातून महेश लोंढे ,सोलापुरातून विजयकुमार लोंढे, अंगद जेटिथोर यांनी  दिली.महेश क्षिरसागर यांनाही हा भीमटोला आवडला.  खबरदार...! जात बघून मतदान कराल तर  हा भीमटोला सुद्धा खूप छान होता अशी प्रतिक्रिया सोलापुरातील वाचक अंजली साबळे यांनी दिली.  बहुजन आवाजचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे. वाचकांच्या प्रेमाबद्दल आम्ही आभारी आहोत.
-संपादक
(भीमटोला वाचण्यासाठी येथे क्लिक करा )
http://bhimtola.blogspot.in/2017/02/blog-post_26.html?m=1

Monday, March 6, 2017

विझलो आज जरी मी,

 विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही.....
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही

छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही

माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे..
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..

रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर..
डोळ्यांत जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही..

येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही

- सुरेश भट                       

Friday, March 3, 2017

कैकाडी समाजाच्या चिमुकल्याने गाजविला ऑस्कर सोहळा


बाल अभिनेता -सनी पोवार
मुंबई :- जगभरात सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेटवर चालण्याचा अनुभव मुंबई येथे राहणाऱ्या कैकाडी समाजाच्या सनी पोवारने अनुभवला. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बॉलिवूडच्या ललनांहून अधिक लक्षणीय पुरस्कार सोहळा सनीमुळे ठरला.  हा सोहळा खऱ्या अर्थाने त्यानेच गाजविला.सूत्रसंचालक जिमी किमेल यांनी प्रेक्षकांमधून उचलून त्याला अभिनय कौशल्याची संधी दिली.
     २०१५ मध्ये "लायन" या हॉलिवूडच्या चित्रपटासाठी मुंबई, पुण्यातील सुमारे २००० मुलांमधून सनीची निवड करण्यात आली.  "लायन" या चित्रपटात त्याने ५ वर्षाच्या "सरू" या मुलाची  व्यक्तिरेखा साकारली आहे.  "आम्ही शिकलो नाही मात्र सनीला आम्ही शाळा पण शिकवणार आणि चित्रपटात कामही करायला देणार " असे सनीचे वडील दिलीप पोवार म्हणाले. 
   सनी कलिना येथील एअर इंडिया मॉडर्न या शाळेत शिकतो. दुभाषाच्या मदतीने त्याने चित्रपटातील प्रसंग  समजावून  घेतले. सनी कैकाडी समाजाचा  असल्यामुळे त्याच्या घरी तेलगू व कानडी मिश्रित भाषा बोलली जाते. त्यामुळे त्याची संभाषणाची भाषा हिंदी आहे. सनी ज्या परिसरात राहतो तेथेही अनेक कैकाडी समाजची घरे आहेत. 'आमच्या समाजातील मुलाने खूप नाव कमावले' असा आनंद ते व्यक्त करतात. ऑस्कर सोहळ्यातील सनीचे छायाचित्र त्याच्या राहत्या घरी झळकत आहे.


 
 मुलाने नाव कमविले;वडिलांनी नोकरी गमावली

मुलासोबत दौऱ्यावर राहिल्याने पालिकेच्या सफाई विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या दिलीप पोवार यांना कामावर हजर न राहिल्याने आपली नोकरी गमवावी लागली आहे. मुलाने नाव कमविल्याचा आनंद दिलीप यांना आहे मात्र नोकरी गेल्याने त्याला दुःखाची झालरही आहे. सनी याची आई घरकाम करून घर चालविते.