Sunday, October 27, 2024

धम्माची वाटचाल धर्माकडे...?

 मागच्या आठवड्यात बौद्ध समाजाचा एक मित्र कार्यालयात आला होता. त्याच्यासोबत गप्पागोष्टी होत असताना माझे लक्ष त्याच्या हातावर बांधलेल्या पांढऱ्या धाग्यावरती गेले. मित्र बौद्ध आहे. कोणतेही कर्मकांड बौद्ध लोकात होत नाही म्हणून उत्सुकतेने त्याला पांढरा धागा मनगटावर का बांधला? याचे कारण विचारले. मित्राने सांगितले वर्षावास सुरू होता. त्यानिमित्त भंतेजींना आम्ही घरी बोलाविले होते आणि पूजापाठ झाल्यावर भंतेजींनी घरातील सर्व सदस्यांच्या हातावर हा पांढरा धागा बांधला. या धाग्यामुळे निगेटिव्ह गोष्टींपासून संरक्षण होईल, असे भंतेजींनी कुटुंबातील सर्वांना धम्मदेसना देतेवेळी सांगितले. त्यामुळे माझ्या कुटुंबातील सर्वांनीच मनगटावर पांढरा धागा बांधून घेतला आहे असे उत्तर मित्राने दिले.   

      नुकताच ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आपण मोठ्या उत्साहात साजरा केला. बाबासाहेबांनी बौद्ध धम्म हा विज्ञानवादी धम्म आहे म्हणून त्याचा स्वीकार केला अशी अनेक भाषणे ऐकली.अनेक लेख आम्ही वाचले. मागील ६८ वर्षांत आम्ही खरंच बौद्ध झालो आहोत काय? की केवळ बौद्ध असल्याचा देखावा करीत आहोत हा प्रश्न आज प्रत्येकाने स्वतःला विचारणे गरजेचे झाले आहे. कारण आम्ही केवळ आमची बाह्य प्रतीके बदलली आहेत. आमचे आचार-विचार हे बुद्धाच्या विचारांचे नाहीत. देव-देवतांचे फोटो काढून देव्हाऱ्यात आम्ही बुद्धाला आणि बाबासाहेबाला बसविले. पांढरे कपडे घालू लागलो. काळया मंगळसूत्राच्या जागी पांढरे मंगळसूत्र आले. गळ्यात काळया दोऱ्यात साईबाबाचे फोटो असायचे त्याच्या जागी आता बुद्धाचा फोटो आला आहे. आम्ही थोडक्यात देव बाजूला ठेवले आणि त्याच्या जागी बुद्धाला आणि बाबासाहेबाला देव केलं आणि त्यांची पूजाअर्चा सुरू केली. थोडक्यात आमचा मेंदू आजही हिंदू धर्माच्या गुलामगिरीत अडकून पडलेला आहे. बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध नेमका कशासाठी दिला हेच अजून समजून आलं नाही. जन्म,वाढदिवस,लग्न,मृत्यू या कार्यक्रमात केवळ त्रिसरण पंचशील आणि इतर काही गाथा म्हणणे म्हणजेच बौद्ध होणे एवढेच आम्हाला माहित आहे. आम्हाला त्या गाथांचा, त्रिसरणांचा, पंचशीलाचा अर्थही माहित नाही. आम्ही केवळ भक्ती भावाने डोळे बंद करून हे सर्व करीत आहोत आणि स्वतःला बौद्ध म्हणवून घेत आहोत. त्यात आता मनगटावर पांढरा धागा बांधण्याचा प्रकार सुरू झाला.       

        भंते हातावर पांढरा धागा बांधून देत आहेत म्हणून तो आम्ही बांधून घेत आहोत. आमच्यापैकी कुणालाही भंतेना प्रश्न विचारू वाटत नाही का? हिंदू लोक मनगटावर लाल धागा बांधतात त्याला आम्ही कर्मकांड मानतो आणि त्याचा कडाडून विरोध करतो. त्यांची चेष्टा करतो. मग जेव्हा आम्ही बौद्ध आमच्या मनगटावर पांढरा धागा बांधतो तेव्हा हे कर्मकांड नव्हे काय? तथागताने ४५ वर्ष लोकांच्या कल्याणाचा धम्म लोकांना वाटला. त्याचा प्रचार प्रसार केला. या ४५ वर्षात तथागतांनी कोणत्या भंतेच्या किंवा कोणत्या उपासकाच्या मनगटावर पांढरा धागा बांधला ते सांगा.   

      धागा शरीरावर बांधला जाईल. मनाचे काय? मनावर काय बांधाल? बुद्धाने माणसाच्या मनाला वळण लावण्याचे काम केले आहे.धागा बांधल्याने व्यक्तिमत्त्व बदलेल काय? धागा बांधून बुद्ध धम्माचा प्रसार होणार आहे काय? धागा बांधून घेतल्याने उपासक शीलवान,प्रज्ञावान होणार आहे काय?धम्म प्रसार करण्यासाठी खरंच हातावर धागा बांधणे गरजेचं आहे काय?     

      ज्या गोष्टीला तथागताने विरोध केला त्याच गोष्टी पुन्हा तथागतांच्या धम्मामध्ये घुसविल्या जात आहेत.अज्ञान, विषमता, तुच्छता, अंधश्रद्धा यांचा अंधार जाळण्याचे मोठे कार्य बुद्धांनी केले. बुद्धाने ईश्वर मानला नाही. आत्मा मानला नाही. धर्म,संप्रदाय, ईश्वर,आत्मा, स्वर्ग - नरक परलोक, पूर्वजन्म,पुनर्जन्म यांच्या संकटात सापडलेल्या समाजाला त्याने त्या संकटातून बाहेर काढण्याचा कार्यक्रम राबविला. माणसाला माणसाशी जोडण्याचे काम बुद्धाने केले. तर्कनिष्ठ, बुद्धिवादी, विज्ञानवादी मार्ग त्याने समाजाला सांगितला. आपण प्रेषित आहोत, अवतार आहोत,देव आहोत असा आणि माणसांच्या बुद्धीचा अवमान होईल,ती नाकारली जाईल किंवा तिची गळचेपी होईल असा कोणताही देखावा बुद्धाने उभा केला नाही. बुद्ध तत्त्वज्ञाच्या हिमतीने बोलत होता. सत्याला सत्याचीच शक्ती असावी. त्याला कोणताही अंधश्रद्धेचा, दैवीवादाचा पांगुळगाडा नको होता. बुद्ध स्पष्ट, सरळ, सुबोध अशा पद्धतीने लोकांशी बोलत होता.त्यांना सत्य सांगत होता.   बुद्धाच्या नंतर महायानाने बुद्धाला ईश्वर केले. त्याची भक्ती सुरू केली. बुद्धाच्या मूर्तीची पूजा सुरू केली. बुद्ध पुण्य देणारा, पाप नष्ट करणारा देव ठरला. महायनाने बुद्ध नावाच्या तत्त्वज्ञ माणसाला दैवी रूप देऊन त्याचा देव करून टाकला. आणि हाच दैवी रूपवाला बुद्ध अनेक ठिकाणी पोहोचला.आज जो बुद्ध सांगितला जातोय तो महायानवाला बुद्ध सांगितला जातोय.    

        एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल ती म्हणजे बाबासाहेबांनी पारंपारिक बुद्धाशी आपले नाते जोडले नाही.त्यांनी आपल्याला 'ओरिजनल असा बुद्ध' दिला आहे आणि त्याचेच नाव 'नवयान' आहे. परंतु दुर्दैवाने मूळ बुद्ध आज कोणीच सांगत नाही.   आज बुद्धाचा पंचशील, अष्टांगिक मार्ग साध्या, सरळ सोप्या भाषेत का सांगितला जात नाही? किती भंते बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा वर धम्मदेसना देतात? किती भंते बाबासाहेबांचा नवयान बुद्ध मांडतात.हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच भंते मूळ बुद्ध मांडत आहेत त्याचा प्रचार प्रसार करीत आहेत.     

       जो कोणी बुद्धाच्या धम्माचा प्रचार करीत आहे असे सांगून तर्कवादावर, बुद्धीवादावर न पटणारा बुद्ध सांगत असतील तर तो बुद्ध मूळ बुद्ध नसून तो महायान बुद्ध आहे असे ओळखावे.हिंदू प्रतीके वेगळ्या रूपात, रंगात स्वीकारून बौद्ध होता येणार नाही त्यासाठी अंतर्मनातून बौद्ध व्हावे लागेल. प्रज्ञा, मैत्री, करुणा यांचा स्वीकार करून ते आचरणातही आणावे लागेल.     

       धम्माची धर्माकडे होत असणारी वाटचाल रोखायची असेल तर बाबासाहेबांचा नवयान समजून घेण्याशिवाय पर्याय नाही.


-आयु. बुद्धजय सुशीलादेवी अण्णासाहेब भालशंकर

मो.९९६०३७२७३६

Monday, August 5, 2024

यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम गरजेचे - सोनकांबळे

 

सोलापूर :- जीवनात यश मिळविण्याचा कोणताही शॉर्ट कट मार्ग नाही . अनेक अपयश येत असतात परंतु त्याला न घाबरता योग्य दिशेने परिश्रम घेतल्यास यश नक्की मिळते असे प्रतिपादन बार्टीच्या प्रकल्प संचालिका प्रणाली सोनकांबळे यांनी केले. त्या महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात निवड झालेल्या खंडू कोळी आणि निखिल हावळे या विद्यार्थ्यांचा सम्यक अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. यावेळी विचार मंचावर राज्यकर निरीक्षक बुद्धजय भालशंकर,लोकराजा फाउंडेशनचे अध्यक्ष आशुतोष तोंडसे, डॉ. राजदत्त रासोलगीकर, प्रा. पल्लवी मेश्राम यांची उपस्थिती होती.
     खंडू कोळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, "विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीचा कोणताही बाऊ न करता योग्य दिशेने अभ्यास करावा. परीक्षेत होणाऱ्या चुकांवर काम करावे आणि झालेल्या चुका पुढील परीक्षेत कमी केल्यास यश हमखास मिळते."
   निखिल हावळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की," अनेक विद्यार्थी केवळ बाजारात उपलब्ध  असलेली पुस्तके वाचत बसतात. अनेकांना परीक्षेचा अभ्यासक्रमही माहित नसतो. त्यामुळे आपण देत असलेल्या परीक्षेचा अभ्यासक्रम आधी जाणून घेऊन पुस्तकांची निवड करावी आणि जुन्या प्रश्नपत्रिका सोडविण्यावर विद्यार्थांनी भर द्यावा.
   बुद्धजय भालशंकर म्हणाले की, पे बॅक टू सोसायटी हे ब्रीद घेऊन सम्यक अकॅडमी आर्थिक परिस्थिती नसलेल्या समाजातील वंचित वर्गाला मोफत मार्गदर्शन करीत असून त्यातून विद्यार्थी यश संपादन करून प्रशासनात दाखल होत आहेत ही अत्यंत गौरवाची बाब आहे. परिस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांनी अकॅडमीच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती चव्हाण यांनी तर भौरम्मा वाघमारे यांनी सर्वांचे आभार मानले.  

Monday, July 29, 2024

आधी लग्न,नंतर प्रेम

बारावी शास्त्र शाखेत दोन वाऱ्या केल्यानंतरही उत्तीर्ण होण्याचा विचार दिसत नाही म्हटल्यावर लातूरला आय. टी. आय. केलं. आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने नोकरी शिवाय पर्याय नव्हता. पाहुणे मंडळींनी नोकरीची हमी दिल्याने लग्न करण्याचा बेत पक्का झाला. वधू संशोधनाचा मुहूर्त पक्का झाला. आमची स्वारी वडील, चुलते,यांच्यासह सासुरवाडीत (होणाऱ्या ) हजर झाली. वडील व चुलते पाहुण्यांसह इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते.  मी मात्र माझी होणारी ती कुठे आहे, कशी असेल ? ती मला पसंद करील किंवा नाही याचा शोध घेत होतो. अन झालं,पाहुण्यांनी माझ्या होणाऱ्या तिला चहा आणायला सांगितलं. चहा घेऊन येताना माझी 'ती' जेवढी गोंधळी नव्हती तेवढा तिच्यापेक्षा जास्त मीच गोंधळलो होतो. वधू संशोधन झालं. तिनं मला ,मी तिला पसंद केलं, आणि तिचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर लग्नापूर्वी होणाऱ्या सासुरवाडीला मित्राच्या लग्ना निमित्त गेलो. अक्षता पडल्या, जेवणं झाली पण माझं लक्ष मात्र ठिकाणावर नव्हतं. ती कुठे दिसतेय का?, मला बघतेय का? असं सारखं वाटत होतं. पण तसं काही घडत नव्हतं. शेवटी सासऱ्याच्या घराच्या बोळातून जाण्याच्या विचार केला. बोळ अरुंद. घर जवळ आलं तरी काही फायदा नाही. घर ओलांडून पुढे गेलो अन समोरून  साक्षात "ती" येत होती.  समोरासमोर येईपर्यंत तिला काहीच कळलं नाही. एकमेकांना धडकणार तेवढ्यात ती थांबली. काळजाचे ठोके वाढले, घामाने दरदरून गेली. तिला वाट करून देऊन पुढे निघून गेलो.
           हुंडा, मान -सन्मानाचा विचार न करता लग्न तिथी नसताना आषाढ महिन्यात लग्न उरकून घेतलं. फार मोठ्या अपेक्षा असताना त्या पूर्ण झाल्या नाहीत. लग्नात बूटही मिळाला नाही. साधी प्लास्टिक चप्पल घेतली होती. मी तीही  घातली नाही. पण पुढे माझ्या सौभाग्यवतीने कशाचीच उणीव भासू दिली नाही.तिच्या प्रेमापुढे काहीच कमी पडलं नाही.इतर लोक आधी प्रेम नंतर लग्न करतात परंतु आम्ही आधी लग्न नंतर प्रेम केलं. त्यामुळे सर्व काही व्यवस्थित चालू आहे. ऑगस्ट १९८५ मध्ये लग्न झालं. मुलं झाली. वेल मांडवाला गेला.

-  अण्णासाहेब भालशंकर
                     सोलापूर

(१९९८ मध्ये दै.  संचार मध्ये 'भेट तुझी माझी स्मरते' या सदर मध्ये प्रकाशित )