दिनांक २५ नोव्हेबर १९४९ ला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेत शेवटचे भाषण झाले.
ते म्हणाले
२६ जानेवारी १९५० ला भारत एक स्वतंत्र राष्ट्र होईल.*
त्यांच्या स्वातंत्र्याचे काय होईल ? तो आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवील की पुन्हा गमावून बसेल ? हा विचार माझ्या मनात प्रथम उभा राहतो.
असे नाही की भारत हा यापूर्वी कधीही स्वतंत्र नव्हता. मुद्दा हा आहे की त्याने असलेले स्वातंत्र्य एकदा गमावले आहे , पुन्हा दुसऱ्यांदा ते गमाविल का ? भूतकाळात भारताने केवळ आपले स्वातंत्र्य गमावले असे नव्हे तर ते देशातील काही लोकांच्या बेइमानी आणि विश्वासघातामुळे गमावले गेले हि वास्तविकता मला अधिक अस्वस्थ करते.
महम्मद बीन कासीमने सिंध प्रांतावर आक्रमण केले त्यावेळी दहार राजाच्या सैनिक अधिकाऱ्यांनी महम्मद बीन कासीमच्या हस्तकाकडून लाचा स्वीकारल्या आणि आपल्या राजाकडून लढण्याचे नाकारले.
महम्मद घोरीला भारतावर आक्रमण करण्याचे निमंत्रण देणारा जयचंद हा होता.आणि त्याने त्याला पृथ्वीराज विरुद्ध लढण्यासाठी स्वतःच्या आणि सोळंकी राजाच्या मदतीचे आस्वासन दिले .
जेव्हा छत्रपती शिवाजी हिंदूंच्या मुक्तीसाठी लढत होते त्यावेळी इतर मराठे सरदार आणि रजपूत राजे मोगल सम्राटांच्या बाजूने लढत होते.
जेव्हा शीख राज्यकर्त्यांना नि:पात करण्याचा प्रयत्न इंग्रज करीत होते तेव्हा त्यांचा सेनापती गुलाबचंद शांत बसला आणि शिखांचे राज्य वाचविण्यासाठी त्याने शिखांना मदत केली नाही.
१८५७ ला भारतातील बहुतांश भागांनी इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्य युद्धाची घोषणा केली तेव्हा शीख बघ्यांच्या भूमिकेतुन त्या घटनेकडे पाहत राहिले.
*इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय* ?
जातीच्या आणि संप्रदायाच्या स्वरूपातील आपल्या जुन्या शत्रू सोबतच भिन्न आणि परस्परविरोधी विचार प्रणाली असणाऱ्या राजकीय पक्षांची भर पडणार आहे. ह्या वास्तवाच्या जाणिवेने मी अधिकच चिंतातुर झालो आहे.
भारतीय लोक आपल्या तत्वप्रणालीपेक्षा देशाला मोठे मानतील की देशापेक्षा तत्वप्रणालीला मोठे मनातील? परंतु एवढे मात्र निश्चित की जर राजकीय पक्षांनी स्वतःच्या तत्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले तर आपले स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.आणि कदाचित कायमचे घालविले जाईल.या संभावेविरुद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध व्हायला हवे.
आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धार केलाच पाहिजे.
ह्या लोकसत्ताक संविधानाचे काय होणार ?
हा देश ते अबाधित ठेवण्यासाठी समर्थ राहील का पुन्हा तो ते गमावून बसेल.
भारताला लोकशाही म्हणजे काय हे माहित नव्हते असे नाही, एक काळ असा होता की भारत हा गणराज्यांनी भरगच्च होता आणि जिथे कुठे राजेशाही असेलच तर ती एकतर निवडलेली किंवा सीमित असायची भारताला संसद किंवा संसदीय प्रणाली माहित नव्हती असे नाही बौद्ध भिक्खू संघाच्या अभ्यासातून हे स्पष्ट होते की बुद्ध काळात संसद होती.बौद्ध भिक्खू संघ म्हणजेच संसद होय.
*ही लोकसत्ताक पद्धती भारताने गमावली.पुन्हा दुसऱ्यांदा ती गमावणार काय*?
परंतु भारतासारख्या देशात हे सहज शक्य आहे.
*लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये.तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की जेणे करून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उध्वस्थ करण्यासाठी उपयोग करील.*
संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतित केलेल्या महापुरुषाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काही गैर नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत.
*इतर देशांच्या तुलनेत भारताला हा सावधगिरीचा इशारा लक्ष्यात घेणे अधिक गरजेचे आहे. कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल, परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अंधः पतन आणि अंतिमत: हुकूमशाही कडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.*
केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानत कामा नये , आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीत(धार्मिक नव्हे) परिवर्तन करायला हवे. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही.
*सामाजिक लोकशाही म्हणजे काय?...तो एक जीवन मार्ग आहे.जो स्वातंत्र्य, समता, बंधुता यांना जीवनतत्त्वे म्हणून मान्यता देतो.*
हजारो जातींमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल?
सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही याची आम्हाला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते आमच्या हिताचे ठरेल.
*स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे या बद्दल शंका नाही. परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत याचा आपण विसर पडू देता कामा नये. या स्वातंत्र्यामुळे कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजांवर दोषा रोप करता येणार नाही, यापुढे जर काही वाईट घडले तर त्यासाठी आपल्याशिवाय इतर कुणालाही दोषी धरता येणार नाही.*!!!!!
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर*
*लेखन आणि भाषणे*
(महाराष्ट्र शासन)
*खंड १८, भाग ३*
*पान न.१६०-१७५*